नमस्कार मंडळी,
मराठी साहित्य, कला, संस्कृती आणि भाषेला अर्पण केलेले ’रसयात्रा डॉट कॉम [rasayatra.com]’ हे वेबपोर्टल रसिक मराठी/अमराठी वाचकांपुढे सादर करतांना आम्हांला अतिशय आनंद होत आहे.
रसयात्रा – ही यात्रा आहे शब्दांची, शब्दांनी शब्दांच्या गावाला जाण्याची, किंबहुना शब्दांच्याही पलिकडे जाण्याची. हा प्रवास आहे भावभावनांना सोबतीला घेऊन अज्ञाताच्या वाटेवर चालण्याचा, विचारांना अंतर्मुख करण्याचा, कल्पनेच्या विशाल गगनभरार्या घेण्याचा. या यात्रेला कशाचेही बंधन नाही. हा मेळावा जितका बालगोपाळांचा, तरुणांचा, स्त्री पुरुषांचा, ज्येष्ठांचा आहे तितकाच विचारवंतांचा, अभ्यासकांचा, टीकाकारांचा देखील आहे. आम्हाला खात्री आहे ही यात्रा आपल्यासारख्या शब्दवेड्या वाचकांना नक्कीच आनंद देईल.
आपण कार्यरत असलेल्या क्षेत्रात आपले घ्येय ठरले असले पाहिजे. या तत्वानुसार सांगोपांग विचार करुन हे पोर्टल मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि साहित्य निर्मितीसाठी बनवावे असे आम्हांस वाटले. साहित्य निर्मिती का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याआधी थोड्याशा वेगळ्या दॄष्टीकोनातून जगण्याचा अर्थ शोधण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.
खरे तर आज सर्वत्र दिसत असलेले आधुनिक तंत्रज्ञानाने, विज्ञानाने निर्माण केलेले जग आणि स्वत:चे आतील जग अतिशय भिन्न आहे. या बाह्य जगात जगतांना माणसाला चिंता, भिती, चिडचिडेपणा यासारख्या अनेक क्लेशकारी भावनांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच तो दैनंदिन कामातला रस, चिंतेपासून मुक्तता, नव-निर्मितीचा निखळ आनंद, यापासून पारखा होत आहे. या विचित्र अशा द्वंद्वात सापडल्यामुळे जीवनाचे अंतिम मूल्य शोधण्याची त्याची वाटचाल अतिशय कठिण बनलेली आहे. माणसाच्या आयुष्याला आलेला एकसुरीपणा त्याला जास्त बधीर करुन टाकणारा आहे. साहित्य या सर्वांपासून थोडा काळ त्याला दूर नेते. बाह्य जगात रमलेल्या मनाला एका जागी स्थिर करुन विचार करायला लावते. आनंद देते. साहित्यामुळे मनावर आलेले मळभ दूर होते. आणि म्हणूनच साहित्यात नवनिर्मिती करण्याचा आनंद मिळावा या हेतूने आम्ही हे पोर्टल साहित्याला वाहिलेले असल्यामुळे साहित्य निर्मिती हे उद्दिष्ट ठेवलेले आहे.
साहित्य निर्मिती हा काही अचानक उत्पन्न होणारा प्रकार नाही. त्याची जडण घडण अगदी लहान वयापासून सुरु होते. आईच्या मांडीवर ऐकलेली बाळगाणी, गोष्टी, बडबडगीते, उखाणे, यापासून या सर्वांना सुरुवात होते. बालवयात पाठ झालेल्या कविता नकळत रसिकता, शब्दभांडार, शब्दप्रियता, कल्पनाशक्ती विकसित करत असतात. भावनांना अनुकूल लय आणि ताल अशा गाण्यांमधून, गीतांमधून आपल्यापर्यंत पोहोचतात. आणि नकळतच छोट्या छोट्या अनुभवातून सुंदर सुंदर चित्रे मनामधे उभी करण्याचा आपल्याला छंद लागतो. अशा छंदातच नवनिर्मितीची बीजे दडलेली असतात.
आणि याच कारणामुळे आम्ही जितके महत्व वैचारीक लेख, समीक्षा, रसग्रहण यांना देत आहोत तितकेच महत्व बडबड गाणी, भोंडला भुलाबाई यांना ही देत आहोत. याचबरोबर कविता, पुस्तक परिचय, अनुवाद, ललित यांचा देखील समावेश केला आहे. हा प्रवास अवघड आहे पण तरीही आम्ही आपल्या परिने हा अल्प प्रयत्न करत आहोत. ही यात्रा आपणास जरुर भावेल अशी आम्हास आशा आहे. या वाटचालीत आपण सुद्धा अवश्य सहभाग घ्यावा. काही बहुमुल्य सुचना असल्यास जरुर कळवाव्यात.चला तर रसयात्रेला सुरुवात करु या …….!
धन्यवाद
रसयात्रा संपादक मंडळ
रसयात्रा.कॉम