कंटाळा

सोशल मिडीयावर शेअर करा

नेहमीप्रमाणे न चुकता पहाटे साडेपाच वाजता गजराने ठणाणा केला.

झालं रोजचं रुटीन सुरु असं म्हणत, मनातल्या मनात कुरकुरतच जान्हवीने गजर बंद केला. कधी कधी या घड्याळाचा अस्सा राग येतो की कुठंतरी सांदीकोपर्‍यात दडवून ठेवावं असं वाटतं. एखाद दिवशी साखरझोपेच्या वेळेसच हे बंद पडलं तर किती मजा येईल ! पण तेवढं कुठं चांगलं नशीब? हे बंद पडणार ते सुद्धा दिवसाढवळ्याच. झक मारत बाजारात जा. सेल आणा. बदला. टॉनिक मिळताच महाराज तय्यार गरगरा फिरायला आणि सक्काळी सक्काळी भोकाड पसरायला. नुस्ता वैताग आहे झालं. वैतागून घड्याळाला दुषणे देत जान्हवीने निवांत घोरणार्‍या नवर्‍याकडे जराशा रागानेच पाहिले.

याचं बरं आहे. निवांतपणे सात वाजेपर्यंत लोळणार. अर्धा तास घर डोक्यावर घेत स्वत:चं आवरणार. आयता समोर आलेला नाश्ता खात, चहा पित पेपर वाचणार. बातम्या वाचून जगावर टिका टिपण्णी करणार अन ८.१६ची लोकल पकडायला सुसाट धावणार. बायको आहेच घरातली कामं करायला. चला ! जान्हवीबाई उठा ! लागा कामाला !! असा विचार करुन जान्हवी उठली आणि रोजच्या रामरगाड्याला लागली.

जान्हवी एक सर्वसामान्य गृहिणी. घरकाम, मुलांचे संगोपन आणि बहुतेक वेळा घरची गरज म्हणून नोकरी या सर्वांमधे चोवीस तास, बारा महिने गुरफटलेली. चाकोरीबद्ध आयुष्यात अडकलेली, आला दिवस धावाधाव करुन जगणारी, उद्याच्या दिवसात काय काय धावपळ करायची याची आजच नोंद करुन ठेवणारी. पण कधी कधी या धावपळीत कुठून तरी निवांतपणा अवचित भेटायला येतो अन मनाशी हितगुज सुरु होतं. असंच काहीसं जान्हवीच्या बाबतीत घडलं.

“थकलीय मी आता. कंटाळा आला आता या सगळ्याचा”

“का ग बाई, काय झालं ?”

“अरे हे काय जगणं झालं का? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत नुस्ती वडवड वडवड. दिवस घड्याळाच्या गजराने सुरु होतो आणि गजर लावून रात्री संपतो. सूर्योदय, सूर्यास्त या माझ्या लेखी कवीकल्पना झाल्या आहेत. एक तर हे सर्व डिस्कवरीवर पहायचं किंवा नेटवरचे फोटो पाहून समाधान मानायचं.”

“मग जायचे की मस्त पहाटे पहाटे फिरायला …”

“पहाटे आणि फिरायला? इथं कामाचा डोंगर असतो, डोंगर. चहापाणी, नाश्ता, डब्बे. पोरं शाळेत, कॉलेजात, नवरा नोकरीवर वेळेवर जाण्यापूर्वी सगळं करायचं. सकाळचा वेळ म्हणजे नुस्ती कसरत असते. एक मिनिट जरा इकडं तिकडं चालत नाही. सगळं गणित फिसकटतं मग. हं….” एक सुस्कारा सोडून जान्हवी गप्प झाली. तोंड बंद झालं तरी मन विचार करतच रहातं. पुन्हा विचाररंजन सुरु झालं.

हल्ली सणवार तरी कशासाठी साजरे करत आहे हेच मला समजत नाही. सारखी नुसती धावाधाव. कॅलेंडरवर सणांच्या तारखा दिसतात, पद्धत म्हणून साजरे करायचे. त्याच्या मागच्या कारणमीमांसा, हेतू जाणून घ्यायला वेळच नाही, आणि आता तर काय ती मानसिकताही राहिली नाही. उद्या काय करायचे याचाच फक्त मनात विचार चालू असतो. दिवसामागून दिवस जातात, आठवडे जातात, महीने जातात. कॅलेंडरची पाने भराभर बदलत रहातात, मधूनच कॅलेंडर बदलते. परत तेच रहाटगाडगे.

“उबग आलाय रे धावाधावीचा..” ती करवादली.

“मग एखादा ब्रेक घे ना…”

“ब्रेकच काय मला तर चक्क पळून जावंसं वाटतय. पण काही उपयोग आहे का? तिथेही परत धावणं आहेच. आणि खरं सांगू का ब्रेक जरी घेतला ना तरी फक्त दोन दिवस निवांतपणा बरा वाटतो. जास्त काळ घरापासूनही दूर रहावत नाही. आणि शांत बसणंही सहन होत नाही. कधी एकदा परत आपल्या आपल्या घरी नेहमीच्या आयुष्यात येतो असं होतं.”

“म्हणजे तुला धावपळ हवी पण आहे आणि नको पण.. “

“धावणं नको आहे असे नाही पण कधी कधी वाटतं कशासाठी आपण इतकं धावतोय?”

“तुला आयुष्यात काहीतरी मिळवावं असं वाटत नाही का?”

“वाटतं रे. घर व्हावं, मुलं मोठी व्हावी, चांगली शिकावी, चार पैसे मिळावे म्हणून मी सुद्धा जीवतोड मेहनत केली. आता सगळं मनासारखं झालं पण मलाच कळत नाही की मी धावाधाव का करतेय?”

“हम्म. तुला माहीतीयं का? तुझ्यासारखाच अनेकांना सुद्धा हाच प्रश्न पडला होता आणि पडत राहील. काहींनी निसर्गातून तर काहींनी वैश्विक होऊन तर काहींनी आत्ममग्न होऊन या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला होता.”

“मिळालं त्यांना उत्तर?”

“आपापल्या परीनं त्यांनी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला”

“मी नाही समजले”

“हे बघ आपण फक्त आपल्या सूर्यमालेचाच विचार करु. मला सांग पृथ्वी, मंगळ, गुरु, शुक्र, शनी यांना कुणी सूर्याभोवती फिरायला सांगितले? या फिरण्यामागे त्यांचा काही हेतू आहे तुला वाटते का? नाही ना? मग हेच विश्वाचे रहस्य आहे.”

“रहस्य? म्हणजे?”

“कोणत्याही हेतूशिवाय गतीमानता हेच खरे जीवन. गती थांबली की जीवन थांबले. आज पृथ्वीवर जे जीवन आहे ते तिच्या निर्हेतूक स्वत:भोवती आणि सूर्याभोवती फिरण्यामुळे. तिचे फिरणे थांबले की इथले जीवन संपले. हाच नियम सर्वत्र.”

“म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की माझ्या धावण्यामुळेच माझे जीवन आहे? तसेच तुझे? आणि इतरांचे?”
जान्हवीने मनातल्या मनात विचार करत डोळे मिटून घेतले. हळु हळू तिच्या डोळ्यासमोर एक प्रतिमा साकार व्हायला लागली. मूळ वरती आणि फांद्या खालती अशा उलट स्वरुपाच्या अश्वत्थ वृक्षाची ती प्रतिमा तिच्या डोळ्यासमोर साकार झाली. बघता बघता त्यातील काही पाने गळतांना दिसायला लागली. काही फांद्या आपोआप दिसेनाशा होत होत्या. मुळं वरती आकाशात सरकत होती. नवीन फांद्या उगवत होत्या. नवीन पाने उमलत होती. सतत हालचाल दिसत होती. अचानक तिला काही पाने ओळखीची वाटली. एक अचानक गळून पडणारे पान तिने पाहिले. तिच्यावर तिला तिच्या आवडत्या आजीचा चेहरा अंधुक दिसला. तिने डोळे फाडून फाडून पाहिले. एका पानावर तिच्या वडिलांचा चेहरा दिसला तर एका पानावर तिच्या सासर्‍यांचा करारी चेहरा असावा असा तिला भास झाला. त्या प्रतिमेतील पानांच्या गर्दीत ती स्वत:ला शोधायला लागली. फांदीतुन फांदी, फांदीला पानं अशा पसरलेल्या दाटीत तिला तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. ते झाड स्वत:भोवती हळु हळू पण एका ठाम गतीने फिरत होते. तिने झाडाच्या आजुबाजूला पाहिले तिथे सुध्दा तिला एक गती दिसली. चंद्र, तारे, सूर्य, ग्रहमाला, धुमकेतु, आकाशगंगा. ती एका स्वप्नात जणू काही गुंगुन गेली होती. बघता बघता तिच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. पाणी पुसायला म्हणून तिने डोळ्याला हात लावला आणि दचकून भानावर आली. समोर तिचंच घर आणि घराच्या प्रेमळ भिंती तिच्याकडे जणू काही आश्वासक नजरेने पहात होत्या. हळू हळू तिच्या चेहर्‍यावर स्मित पसरलं. मगाचा कंटाळा आता कुठल्या कुठे पळून गेला होता. तितक्यात शिट्टीचा आवाज आला. तिने पदर खोचला आणि पुन्हा स्वयंपाकघराकडे वळाली.

गतीनेच बनलेल्या या जगात तिला तिची गती कायम राखणे आवश्यकच होते, कारण गती हीच अस्तित्वाची खूण आहे.

(पूर्व प्रसिद्धी – रोहिणी मासिक)


सोशल मिडीयावर शेअर करा
Skip to content