दिंडी

सोशल मिडीयावर शेअर करा

दिवसभराचा धुराळा, प्रदूषणाचा निचरा होऊन ताजीतवानी झालेली मस्त हवा. पहाटेचा किंचित झोंबणारा गारवा, पाखरांचा चिवचिवाट आणि गाण्याच्या लकेरींनी मनाला भावणारा सुरेलपणा. पहाटे पहाटे अशा वातावरणात कोणाला बरे नाही आवडणार फिरायला ?

मला तरी हे वातावरण फार आवडते आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मस्तपैकी फिरायला जाते. अशीच एक सकाळ. शालिमार पासून कालिका आणि मग अशोक स्तंभ हा माझा फिरण्याचा आवडता मार्ग. नेहमीप्रमाणे खूप सार्‍या गोष्टींचा मनात विचार करत आपल्याच नादात रमत-गमत मी चालले होते. अचानक पाठीमागून आलेल्या आवाजाने माझी तंद्री मोडली आणि मी थांबून त्या आवाजाच्या दिशेने पाहिले. पन्नास-साठ लोकांचा समुह हातात झेंडे घेऊन लीन होऊन गाणे गात चालला होता. काहींच्या हातात पेटी, तुणतुणे होते तर काही गात होते. अगदी बायका सुद्धा त्यात सामील झालेल्या होत्या. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व जण त्यात होते.

कोण आहेत हे? कुठे चालले आहेत? मला प्रश्न पडला. अन अचानक आठवले. “अरे! हे तर पंढरपूरला आषाढी एकादशीच्या यात्रेला चालले आहेत”. त्यानंतर अशा बऱ्याच दिंड्या मला जाताना दिसल्या. दर आषाढी एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला ही मंडळी जात असतात. पंढरपूरला मोठी यात्रा होते. लाखो लोक धार्मिक कारणांसाठी पंढरपूरला भेट देत असतात.

मी त्या लोकांकडे बघत होते. पुरुषांनी शर्ट (झब्बा) आणि पायजमा किंवा धोतर परिधान केले होते. काहींच्या डोक्यावर गांधी टोपी होती तर काहींच्या मुंडासे. स्त्रिया विविध रंगांच्या साड्या नेसल्या होत्या. काहींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन होते. चालता चालता सर्वजण अभंग भजन म्हणत होते. ते अतिशय आनंदात दिसत होते. खरे सांगू… मला त्यांच्या बद्दल थोडी असूया वाटली. नाही.. नाही.. त्यांच्याकडे पैसे, प्रचंड संपत्ती किंवा सुखसोयींची साधने आहेत म्हणून नाही तर मला ते माझ्यापेक्षा जास्त समाधानी, आनंदी वाटले म्हणून.

ही सर्व मंडळी अशा ग्रामीण भागातून आलेली आहेत की जिथे एक हंडाभर पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करावी लागते. कधी लवकर तर कधी आलेला मान्सुन त्यांच्या आशेवर पाणी फिरवतो. चंगळ म्हणून ज्या गोष्टी मी आज खरेदी करते वापरते त्या गोष्टी त्यांना माहीत असतील तरी का अशी शंका वाटते. याची मला नीट कल्पना आहे. तरी माझ्याकडे असे काय नाही जे त्यांच्याकडे आहे?

उन्हातान्हाची पर्वा न करता मैलोनमैल चालणे, आभाळाच्या छताखाली झोपणे, जे मिळेल ते खाणे, आणि एवढे करूनही कशाही बद्दल तक्रार न करणे ही साधी सोपी गोष्ट नाही. निदान माझ्यासारखीला तरी जिचे लहानपणापासूनचे आयुष्य शहरात गेले आहे. ही सर्व मंडळी आनंदी उत्साही वाटत होती. मग अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे हे सर्व लोक कोणीही, कसलीही बळजबरी करत नसताना आनंदाने ही अग्नी परीक्षा देत आहेत आणि ते सुद्धा वर्षानुवर्ष करण्याची त्यांची तयारी आहे.

ती गोष्ट म्हणजे त्यांची श्रद्धा. त्यांचा विश्वास. त्यांच्यापासून भिन्न वाटणारा पण त्यांच्यातच विद्यमान असलेल्या, शब्दात न मांडता येणाऱ्या अशा कशावर तरी असलेली त्यांचे अतूट श्रद्धा हेच त्यांचे बळ. पंढरपूरच्या वाटेमध्ये ते स्वत:ला शोधणार होते. त्यांच्यासाठी पंढरपूर महत्त्वाचे नव्हते. तर तो प्रवास महत्वाचा होता कारण हाच प्रवास त्यांना स्वतःला अधिक चांगले समजून घेण्यास मदत करणार होता आणि हीच गोष्ट त्यांच्यामध्ये आनंद निर्माण करत होती जो त्यांच्या उजळलेल्या चेहऱ्यांवर लख्ख दिसून येत होता. प्रत्येक चेहरा जणू काही विठ्ठलाचे मुख बनला होता.

आणि ही नेमकी गोष्ट माझ्या नास्तिक जीवनात नव्हती.

परमेश्वरा! माझ्या जीवनात आस्तिकतेचा दिवा उजळु दे !
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल !!

(पूर्व प्रसिद्धी – रोहिणी मासिक)


सोशल मिडीयावर शेअर करा
Skip to content