एखादा व्यवसाय करायचा म्हणजे नक्की काय करायचं असतं? व्यवसाय उभारणी करण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज असते? पैसा आवश्यक आहे ही संकल्पना पुरेसी आहे? या व अशा अनेक व्यवसायात संबंधित बाबींची अनेक जणांना नीटशी कल्पना नसते. अशा परिस्थितीत केवळ ठोकताळे किंवा जुजबी माहिती अथवा परंपरागत ज्ञान यावर आधारित विचार करून व्यवसाय सुरू केला जातो.
एम.बी.ए. न करताच व्हा उद्योजक
लेखक : जॉश कॉफमन
अनुवाद : मृणाल काशीकर खडक्कर
मंजुल पब्लिशिंग हाउस ( किंमत ४५० )
मात्र व्यवसायात अपेक्षित कृती त्यातील तारतम्यासह न केल्याने व्यवसाय नीट चालत नाही अशी अवस्था होते. अशा परिस्थितीत अनेकांना असे वाटते की आपण एम.बी.ए. कोर्स (व्यवस्थापन शास्त्रातील एक पदवी) केला असता तर बरे झाले असते. ही बाब खरी आहे का? व्यवसाय नीट करण्यासाठी एम.बी.ए. करणे आवश्यकच आहे का? एम.बी.ए. नसेल तर उद्योग चालवणे व्यवसाय करणे खरेच अवघड आहे का? तसे असेल तर अनेक तरुण एम.बी.ए. झाल्यावर उद्योग सुरू न करता केवळ नोकरीच्या मागे का लागतात? स्वतंत्र उद्योग करण्याची धडपड करताना का दिसत नाहीत? किती यशस्वी उद्योजक व्यवसायिक एम.बी.ए. पदवी विभूषित आहेत? खोलवर विचार केला तर चित्र वेगळेच दिसते.
व्यवसाय करण्यासाठी एम.बी.ए. असणे अजिबात गरजेचे नाही. एम.बी.ए. करण्यासाठी पैसे घालवण्याची, प्रसंगी शैक्षणिक कर्जाचा भार आपल्या डोक्यावर लादून घेण्याची काहीच गरज नाही. उलटपक्षी व्यवसायाची काही मूलभूत तत्त्वे तुम्ही समजून घेतलीत तर व्यवसाय करणे तुम्हाला सोपे जाईल हे ठामपणे प्रतिपादन करणारे पुस्तक म्हणजेच जॉश कॉफमन यांचे “एम.बी.ए. न करताच व्हा यशस्वी उद्योजक” अर्थात “दि पर्सनल एम.बी.ए. – मास्टर ऑफ बिझनेस” या इंग्रजी पुस्तकाचा मृणाल काशीकर खडक्कर यांनी केलेला मराठी अनुवाद.
एखाद्या व्यवसायाला सुरुवात करायची असेल किंवा तुम्ही सध्या एखादा व्यवसाय करत असाल किंवा तुम्ही भले नोकरी करत असाल, तरी हे पुस्तक नक्की उपयोगी पडू शकते. हे पुस्तक वाचून तुमच्या व्यवसायाबद्दलच्या कल्पना अधिक स्पष्ट होतील. काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा होईल. कोणत्या गोष्टी अधिक महत्त्वाच्या आहेत, कोणत्या गोष्टी कमी महत्त्वाच्या आहेत याचे तुलनात्मक विचार अधिक स्पष्ट होतील. यामुळे अनावश्यक असलेला फापटपसारा कमी करून तुम्ही तुमच्या समोरील पर्यायांमधून नेमके पर्याय निवडून महत्त्वाची कामे अधिक कराल. ज्यामुळे तुम्हाला तुमची कार्यप्रणाली अधिक सक्षमपणे वापरता येईल. अचानक उद्भवणाऱ्या तातडीच्या बाबींकडे तत्काळ लक्ष पुरवता येईल.
लेखक पुस्तकाच्या सुरुवातीचा काही भाग पुस्तक का वाचावे विवेचन करतो. तसेच पुस्तकाचा उपयोग कशा रीतीने करावा याबद्दल त्याचे मत देतो. यानंतर उद्योग-व्यवसाय म्हणजे नक्की काय असते? कोणत्या कृती केल्या असता त्या कृती उद्योग/व्यवसाय म्हणून संबोधल्या जातात याचा विस्तृत पण नेमका उहापोह करण्यात आलेला आहे. कोणती गोष्ट व्यवसाय म्हणून गणली जाते, व्यवसाय म्हणजे नेमके काय करणे अपेक्षित असते याचे समग्र चित्रण “मूल्य निर्मिती” या विभागात करण्यात आले आहे. ग्राहकांसाठी मूल्य महत्त्वाचे असते. हे मूल्य विकसित करण्याच्या विविध पद्धती आहेत. त्यांची चर्चा करून विविध उपलब्ध पर्याय कसे वापरावेत यासंदर्भात माहिती दिलेली आहे.
मूल्य निर्मिती तर झाली, परंतु ही मूल्यनिर्मिती अपेक्षित ग्राहकांपर्यंत कशी पोहोचवायची? तर विपणन अर्थात मार्केटिंग मार्फत ते करणे अपेक्षित असते. विपणन कशा पद्धतीने कार्य करते किंवा विपणन कशा पद्धतीने करणे गरजेचे आहे, की ज्यामुळे आपल्याला अपेक्षित असलेला परिणाम साध्य होईल याची चर्चा या विभागात केलेली आहे. संभाव्य ग्राहकांचा कल कसा ओळखावा, त्यांना आपल्या उत्पादन/सेवेमध्ये रस वाटेल अशा कृती कशाप्रकारे करायच्या, उत्पादन कशा पद्धतीने वेगळेपण दाखवत ग्राहकांच्या समोर सादर करायचे याची विस्तृत चर्चा या भागात केली आहे.
विपणनानंतर अर्थातच पुढील भाग म्हणजे प्रत्यक्ष विक्री. म्हणजे ग्राहकांना उत्पादन अथवा सेवा अथवा दोन्ही पुरवणे होय. हे पुरवताना ग्राहक आणि उत्पादक वा सेवादाता यांच्यामधील व्यवहार कशा पद्धतीने चालतो, कशा पद्धतीने चालणे गरजेचे आहे, कोणती पद्धत अधिक लाभदायक आहे याबद्दलचे विचार या विभागात मांडले आहेत.
विक्री करताना प्रत्यक्ष माल वा सेवा ग्राहकांपर्यंत पोचवणे म्हणजेच मूल्य वितरण हा महत्वाचा पुढला टप्पा. या मूल्य वितरणाच्या विविध पद्धती, त्यांचे गुणदोष, उत्पादन वा सेवेला साजेशी योग्य वितरण प्रणाली यांचा सांगोपांग विचार करत आपल्या व्यवसायासाठी योग्य अशी मूल्य वितरण व्यवस्था उभारणे हे व्यवसायाच्या यशाचे गमक आहे. हे साध्य करण्यासाठी आवश्यक उपाय या विभागाच्या सहाय्याने समजून येतात.
मूल्य निर्मिती झाली, त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचली, ग्राहकांनी उत्पादन सेवा खरेदी केली, वितरण झाले. आता महत्त्वाचा टप्पा येतो. वित्त. या संपूर्ण प्रक्रियेमधून व्यवसायाला अपेक्षित वित्त प्राप्ती झाली आहे किंवा नाही याचा विचार फार महत्त्वाचा आहे. मूल्य निर्मिती, विक्री आणि वितरण या गोष्टींसाठी लागणारा माल, श्रम, अनुषंगिक खर्च इत्यादींच्या एकंदर खर्चापेक्षा अधिक काहीतरी मिळाल्याशिवाय व्यवसाय निरंतर मूल्य निर्मिती करू शकणार नाही, थोडक्यात, व्यवसायाला नफा मिळायलाच हवा. नफा नेमका कसा, किती मिळायला हवा हे इच्छा, आकांक्षा यावर अवलंबून असते तसेच व्यवसायातील स्पर्धा, भविष्यकालीन योजना, ग्राहकांची निकड, अशा विविध बाबींवर अवलंबून असते. वित्त हे व्यवसायाचे मूलभूत आधारस्तंभ आहे.
उत्पादन/सेवा मूल्य निर्मिती झाली, विक्री झाली, वित्त प्राप्ती झाली, नफाही मिळाला. म्हणजे सर्व झाले का? तर नाही. ही सर्व प्रक्रिया चालते माणसांच्या आपापसातील व्यवहारांमध्ये. आणि माणसाला मन असते. त्या मनाच्या आधारे त्याचे स्वतःचे तसेच इतरांशी संबंध असतात. कोणतेही काम करताना माणसांच्या मनाचा विचार करावा लागतो. व्यवसायात कर्मचारी असतात, इतर व्यवसायातील माणसांशी संबंध येतात. अतिशय महत्त्वाचे म्हणजे ग्राहक असतात. तीसुद्धा माणसेच असतात. जेव्हा आपण काही कार्य करतो तेव्हा माणसे आणि त्यांचे मन यांचा विचार बाजूला ठेवता येत नाही.
व्यवसाय करताना कशा पद्धतीने मनाचा विचार करावा लागतो अथवा विचार करणे गरजेचे आहे याचे विवेचन “मानवी मन”, “स्वतः सोबत काम करणे”, “इतरांबरोबर काम करताना” या विभागांमध्ये केलेले आहे.
हे सर्व समजून घेऊन तुम्ही व्यवसायासाठी एक प्रणाली/व्यवस्था उभारणे जरुरीचे आहे. ही व्यवस्था तुम्हाला अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी मदत करेल. यासाठी ही व्यवस्था कशी असायला हवी हे समजून घेणे महत्वाचे आहे. त्यानंतर विविध प्रणालींचे विश्लेषण कशा पद्धतीने करायचे ते समजले पाहिजे. आणि महत्वाचे म्हणजे आवश्यकता पडल्यास प्रणालीमध्ये सुधारणा कधी आणि कशी करायची हे माहीत असले पाहिजे. या तीनही महत्त्वाच्या बाबींचे सखोल विश्लेषण तीन भागांमध्ये केले आहे.
एकंदर ११ भागांमध्ये विभागले गेलेले हे पुस्तक व्यवसाय संबंधित सर्वांना अतिशय उपयुक्त पुस्तक आहे यात शंका नाही.