भोंडला भुलाबाई २४ – आला भानू हस्तावरी

आला भानु हस्तावरी
पाऊस पडला शेतावरी

झुळझुळ ओढे वाहतात
मंजुळ गीते गातात

ओढ्याकाठी हिरवळ
गवते करीती सळसळ

हिरवा शालु गवताचा
साज घाला सृष्टीचा

आमचा खेळ मांडीला
भुलोजी राणा भिंतीला

हत्ती काढू पाटावरी
फेरा धरुं सभोवारी

गाणी गाऊ मंजूळ
शोभा आली सोज्वळ

खिरापतीची गम्मत
ओळखा आमुची जम्मत

पोरी हरल्या ओळखेना
खिरापती विना जाईना

खिरापतीला साखर
पोरी पळाल्या घरोघर