दिवाळीचा फराळ

हे गाणे श्राव्यरुपात (ऑडीओ) ऐकण्यासाठी क्लिक करा

दिवाळीच्या दिवसांत कसली ही गडबड ?
आईच्या हातांची चालू आहे लगबग !
चला चला आपण सारे फराळ करु
गाणे गात गात , दिवाळीची मजा करू ॥धृ॥

गोल गोल गिरकी घेत, आली पहा चकली
कुरकूर वाजताना, तोंडातच संपली !
काटेरी अंगाची, चवीला ही छान
एक-दोन खाऊन, भरत नाही मन ! ॥१॥

गोल गोल कडक , कडबोळे भारी,
दातांनी चावायला लागते हुशारी !
वाजवा रे टाळ्या, सांगा छान कोडं,
कडबोळ्याच्या नादाने हसू आले थोडं! ॥२॥

अर्धचंद्रासारखी, सजलेली करंजी
गोड गोड खोबऱ्याने भरलेली करंजी !
खुसखुशीत पापुद्रे , तोंडात विरघळती
खाऊन तिला सारे, आनंदाने डुलती! ॥३॥

रवा-बेसन-बुंदीचे, गोल गोल लाडू
हातात धरून आपण, पटापट खाऊ !
एक लाडू संपता, दुसरा लाडू मागू
गोड गोड हसून, आईकडे बघू ! ॥४॥

पातळ पोह्यांचा, कुरकुरीत चिवडा,
डाळ्या शेंगदाणे अन काजुचा तुकडा !
मस्त पैकी शेव आणि अनारशांची साथ
फराळाच्या ताटात, रंगली रे बात! ॥५॥

चकली, कडबोळे, करंजी, लाडू
चिवडा फराळ, सारे मिळून खाऊ !
पोट झाले टम्म, मन झाले खुश
फराळ खाऊन आता, खेळायला जाऊ ! ॥६॥